विरार : विरार पोलिसांनी एका 8 महिन्याच्या मुलीला 2 लाख रुपयांत विकण्यासाठी आलेल्या चार आरोपींना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या चौघांना 16 फेब्रुवारी पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे


8 महिन्याच्या या निरागस चिमुरडीची आर्थिक फायद्याकरीता 2 लाखात विक्री करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच विरार पोलिसांना याचा सुगावा लागला. ज्या ठिकाणी चिमुरडीची विक्री होणार होती तेथे विरार पोलिसांनी सापळा रचला आणि 4 आरोपींना बेडया ठोकल्या. यात दोन महिला तर दोन पुरुष आहेत. विषेश म्हणजे पिपला उर्फ बिपीन उर्फ डॉक्टर जितेन हा डॉक्टर सुध्दा या कटात सामील होता.


कोरोना काळात चिमुरडीच्या आईचं निधन झालं होतं. तर वडील सोडून गेले होते. आईच्या निधनानंतर चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. आरोपी चौघांनाही वसई न्यायालयानं 16 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या मुलीला बालसंगोपान केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. या कटात नातेवाईक ही सामील आहेत का? याबाबत आता पोलीस तपास करत आहेत.