मुंबई : परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या मुलीची निवड निकषांनुसारच झाल्याचा दावा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे. जगातील टॉप 100 विद्यापीठं असतील, तर उत्पन्नाची मर्यादा शिथिल करण्याचे निकष असल्याचं स्पष्टीकरण बडोलेंनी दिलं आहे.

राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच परदेशात शिकण्यासाठी शासनाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बाब एका शासन
निर्णयामार्फत समोर आली आहे. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागाने तयार केली आहे.

'माझ्या मुलीचं परदेशी शिष्यवृत्तीमध्ये नाव असल्यामुळे अनेकांना संशय निर्माण झाला. मात्र जगातील 300 क्यूएस रँकिंगच्या आतल्या विद्यापिठातील विद्यार्थ्यांची निवड केली जावी आणि जगातील 100 टॉप विद्यापीठ असतील तर उत्पन्नाची मर्यादा शिथिल करण्याचे निकष आहेत, असं बडोले म्हणाले.

सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मुलीलाच परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ


माझ्या अध्यक्षतेखाली निवड समिती होती, मात्र माझ्या मुलीने अर्ज केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना सांगून या समितीतून बाहेर पडलो, असाही दावा बडोलेंनी केला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करुन अंतिम यादीला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचं ते म्हणाले.

या यादीत गरीब मुलं सुद्धा आहेत, फक्त माझ्या मुलीचं नाव आल्याने आक्षेप घेतला जात आहे. पण उत्पन्नाची अट नसल्याने सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येत आहे. हा निव्वळ योगायोग आहे असं मला वाटतं, मंत्र्यांची मुलगी आहे म्हणून शिकू नये असा विषय राहू शकत नसल्याचंही बडोले म्हणाले.

आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही राजकुमार बडोले यांनी सांगितलं. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घेण्यात आली आहे. राजकुमार बडोले यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी सर्व माहिती मागवल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

राजकुमार बडोले यांची मुलगी श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.

समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांची नावंही ही या यादीत आढळतात.

अनुसूचित जातीच्या गरजू विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना मंत्र्यांनी मुलांसाठी वापरल्याचा आरोप होत आहे.