दमानियांवर कुठलीही अश्लील टीका नाही, खडसेंचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 06 Sep 2017 05:51 PM (IST)
दमानियांनी माझ्यावर आरोप केले. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. दाऊद म्हटल्यावर इंटरनॅशनल बातमी झाली. त्यामुळे चांगली करमणूक झाली, असं खडसे म्हणाले
मुंबई : आजवर कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शिवाय अंजली दमानियांविषयी कुठलंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं आहे. खडसे यांनी अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. 'आदरणीय, सन्माननीय अंजली दमानिया यांनी आरोपांची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र मी आजवर कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. अंजली दमानिया केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात. त्यांनी केलेला एकही आरोप सिद्ध झालेला नाही', असं खडसे म्हणाले. पवार आणि तटकरेंविरोधात केलेल्या तक्रारी त्यांनी मागे का घेतल्या, असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला.