मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करत रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह तपासाची संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे.
वास्तुविद्याविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या अर्णब गोस्वामी यांनी हायकोर्टात दोन स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांऐवजी सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. तसेच पोलिसांना याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यापासून मनाई करावी आणि संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारा दुसरा अर्ज सादर केला आहे.
या प्रकरणात रायगड पोलिसांनीच यापूर्वी 'ए समरी' अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही. तसेच फेरतपास करण्याचे आदेश देण्याचा अधिकार सरकारला नाही, असा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने याप्रकरणी दिलेले फेरतपासाचे आदेश रद्द करावे, अशी मागणीही कोर्टाकडे केली आहे. तसेच या प्रकरणाची स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी केली आहे.
अन्वय नाईक यांनी आणि त्यांच्या आईने अलिबाग येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नाईक यांनी गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. नाईक यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी फेरतपासाची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य केल्यानं रायगड पोलिसांनी गेल्या महिन्यात गोस्वामी यांच्यासह अन्य दोघांना अटकही केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गोस्वामी यांची सुटका करण्याचे निर्देश दिले होते.