मुंबई : प्रताप सरनाईक यांना दोन वेळा समन्स बजावून आज सुद्धा ईडीच्या चौकशीला ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. टॉप सिक्युरिटी घोटाळाप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयवर धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये प्रताप सरनाईक यांचा मोठा मुलगा विहंग सरनाईक याला ईडीने चौकशी करता ताब्यात घेतलं होतं. जवळपास पाच तास विहंग सरनाईक यांची चौकशी केली. सरनाईक कुटुंबीयांचे निकटवर्तीय अमित चांडोले यांना चौकशी करून ईडीने अटक केली. त्यावेळी मात्र सरनाईक परिवाराने ईडच्या चौकशीकडे पाठ फिरवली. प्रताप सरनाईक यांना 2 वेळा तर विहंगला 4 वेळा समन्स बजावून सुद्धा दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाही. ज्यामुळे ईडी आता कठोर पावले उचलण्याचा तयारीत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडी विहंग सरनाईक यांना अटक करण्याच्या तयारीत आहे. कारण चार वेळा समन्स बजावून सुद्धा विहंग चौकशीसाठी हजर झाले नाहीत. आपली पत्नी आजारी आहे हे कारण देऊन विहंग सरनाईक यांनी ईडीच्या चार समन्सला जुमानलं नाही. तर परदेशातून परत आल्यानंतर क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर चौकशीला हजर राहण्याची माहिती प्रताप सरनाईक यांच्याकडून ईडीला देण्यात आली. मात्र क्वॉरंटाईन कालावधी संपून सुद्धा प्रताप सरनाईक ईडी समोर चौकशीसाठी आले नाही. पण याचं कारण काय हाच प्रश्न सर्वांना पडतोय.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल
प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. या धाडीमुळे जेवढा धक्का सरनाईक परिवाराला बसला नाही त्यापेक्षा किती तरी मोठा धक्का अमित चांडोले यांच्या अटकेमुळे सरनाईक कुटुंबाला बसला होता. अमित चांदोले प्रताप सरनाईक यांचे कौटुंबिक आणि व्यावसायिक मित्र आहेत. एवढेच नाहीतर प्रताप सरनाईक यांच्यासोबत व्यवसायात अमित चांदोले भागीदार देखील आहे.
सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार प्रताप सरनाईक आणि कुटुंबिय बंगळुरूमध्ये असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे ईडी आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीचे वरिष्ठ अधिकारी थेट दिल्लीमधून या सर्व घटनाक्रमावर लक्ष्य ठेवून आहेत. आणि कायद्याच्या चौकटीत सरनाईक पिता-पुत्रांना आणता येईल का याची चाचपणी ईडीकडून करण्यात येत असल्याचे कळत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात नेमकं हे प्रकरण काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.