नवी मुंबई : प्रेयसीसोबत रिकाम्या इमारतीत सोडलं नाही म्हणून खवळलेल्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. या मारहाणीत रामभाऊ पाईकराव नामक 67 वर्षीय सुरक्षरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खांदाकॉलनी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


हे पाचही आरोपी वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनवर काम करणारे कामगार आहेत. नवीन पनवेलमधील पंचशील नगरमध्ये काल रात्री ही घटना घडली.

यातील एक आरोपी आपल्या प्रेयसीसोबत या विभागातील रिकाम्या इमारतीजवळ गेला होता. मात्र या ठिकाणी कामावर असणारे सुरक्षारक्षक रामभाऊ यांनी या आरोपीला इमारतीत जाण्यास मज्जाव केला. यावरुन सुरक्षारक्षक आणि मुख्य आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. प्रेयसीसमोर अपमान झाल्याने खवळलेल्या या आरोपींन लागलीच फोन करुन चार मित्रांना बोलावून घेतलं. हे चौघे मित्र येताच या चौघांनी मिळून रामभाऊ यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे रामभाऊ हे जागीच बेशुद्ध पडले. त्यानंतर आसपासच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या आरोपींनी सुरक्षरक्षकाला मारहाण करण्यापूर्वी ज्या टोईंग व्हॅनवर हे आरोपी काम करतात, तेथील पोलिस कॉन्स्टेबल तेजस म्हात्रे यालाही फोन लावला होता. त्याच्याच सांगण्यावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसावरही गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.