मुंबई : दिवाळीत गावी किंवा इतरत्र फिरायला जाण्याची तयारीही अनेकांची सुरु झाली असेल. मात्र, यावेळी तुम्ही प्रवासासाठी एसटीचा पर्याय निवडत असाल, तर तुम्हाला थोडे अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीट दरात वाढ केली आहे.

दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवण्यासोबच, एसटी महामंडळाने 600 जादा बसेस सोडण्याचा निर्णयही घेतला आहे. खासगी बस सेवा पुरवणारे दिवाळीच्या काळात अव्वाच्या सव्वा दर आकारतात. म्हणून एसटी महामंडळाने अधिकच्या बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही साध्या आणि निमआराम गाड्यांसाठी 10 टक्के आणि शिवनेरी सेवेसाठी 20 टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र, ही भाडेवाढ दिवाळीच्या काळात ठराविक दिवसांसाठीच असणार आहे.

दरवाढ कोणत्या दिवशी?

22 ते 24 ऑक्टोबर

26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर

5 ते 6 नोव्हेंबर

11 ते 13 नोव्हेंबर

खाजरी बस सेवा पुरवणाऱ्यांच्या तिकीट दराबाबतच्या मनमानीला कंटाळलेल्या प्रवाशांना एसटीचा मार्ग उत्तम ठरणार आहे. तिकीट दरात वाढ केली असली, तरी जादा बस सेवेमुळे प्रवास सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे.