नवी मुंबई : वाशी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या रघुलीला मॉलमध्ये सुरक्षा ग्रील कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

दुसऱ्या मजल्यावर असलेले सुरक्षा ग्रील अचानक कोसळल्याने मॉलमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. दुपारची वेळ असल्याने नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ग्रील कोसळलं तेव्हा मोठा आवाज त्याठिकाणी झाला. त्यावेळी मॉलमधील नागरिकांनी काही कळण्याआधी भीतीने पळापळ सुरू केली. ग्रीलसोबत सिलिंगचा काही भाग कोसळल्याने मॉलमध्ये धुराळा पसरला होता.

मॉलमध्ये चालताना खाली तोल जावून पडू नये म्हणून या लोखंडी ग्रील बसविलेल्या आहेत. मॉलमधील सुरक्षा ग्रील कोसळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रघुलीला मॉल वाशी रेल्वेच्या स्टेशनच्या बाहेरच असल्याने याठिकाणी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. या दुर्घटनेत मॉलचं मोठं नुकसान झालं आहे.