कल्याण : लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ करत जिवंत जाळल्याची संतापजनक घटना कल्याणजवळच्या वसार गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेचा पती आणि सासूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्यायत.


कल्याणजवळच्या काकडवाल गावात राहणारी वैशाली दुधकर हिचा दोन वर्षांपूर्वी वसार गावातल्या संगम वायले याच्याशी विवाह झाला होता. मात्र लग्नात अपेक्षेप्रमाणे हुंडा मिळाला नसल्यानं सासरचे लोक वैशालीचा अनन्वित शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.

20 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वैशालीचा पती संगम आणि सासू लिलाबाई यांनी वैशालीला जिवंत पेटवून देत तिची हत्या केली. यानंतर तिच्या माहेरी फोन करून वैशालीने रॉकेल ओतून घेत स्वतःला जाळून घेतल्याची बतावणी केली.

त्यानंतर वैशालीच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी आधी वैशालीचा पती आणि सासुविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. मात्र वैशालीच्या पोस्टमॉर्टममध्ये तिला मारहाण झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तिचा पती आणि सासूवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. या दोघांचीही रवानगी सध्या कोठडीत करण्यात आली आहे.

वैशालीला अवघा एक वर्षाचा मुलगा आहे. या सगळ्यानंतर वैशालीचा पती आणि सासूला फाशीची शिक्षा देण्याची मागणी वैशालीच्या माहेरच्या लोकांनी केली आहे.