नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना झेपत नसेल, तर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली.

मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री कशा पद्धतीने बोलत आहेत? त्यांच्यामुळे ही परिस्थिती बिघडली आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टानं आपल्याकडे गृहखातं ठेवून घेतलं आहे. मेगा भरतीच्या बाबतीत मुख्यमंत्री गंभीर असते, तर त्यांनी सर्व घटकांना बोलावून चर्चेतून मार्ग काढला असता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं लीड फ्रॉम द फ्रंट, असं आवाहनही त्यांने केले.

भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा विषय होता. त्याचं काय झालं? तसेच, धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणाले होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“इतकी शांततेत आंदोलन काढूनही मराठा समाजाने या सरकारवर विश्वास ठेवला, काहीतरी तोडगा निघेल असं वाटलं. पण खोटे बोल आणि रेटून बोल ही सवय असलेल्या सरकारने शेवटी त्यांचाही घात केला.”, अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजप सरकारवर केली. तसेच, हे आरक्षण सुप्रिया सुळे अजितदादांच्या मुलांसाठी नाहीय, तर सामान्य गरीब मराठा मुलांसाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांना सत्तेत आल्यावर न्यायालय आठवतं, निवडणुकीच्या प्रचारात न्यायालय आठवलं  नाही, असा निशाणाही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांवर साधला.

VIDEO : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?