नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये आडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.  महेश उर्फ करण गुप्ता असं या 32 वर्षीय उच्चशिक्षित भामट्याचं नाव आहे. हा भामटा जीवनसाथी या मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून आरोपी टोपण नावाने अकाऊंट तयार करून त्यात बिसनेस मॅन असल्याचे सांगून उच्चशिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालायचा. ज्या महिला त्याला संपर्क करायच्या त्यांना हा मॉल, रेस्टॉरंट मध्ये बोलावून त्यांच्याशी जवळीक साधायचा आणि संधी साधून विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत या भामट्याने 10 ते 15 महिलांवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली आहे. काही काळ हॅकरचं काम करणारा हा भामटा एका वेळी एकचं सिमकार्ड वापरत असल्यामुळे मागील चार महिन्यांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता.


आरोपी हा सॉफ्टवेअर तज्ज्ञ आहे. तो टॅक्सी बुक करतानाही स्वतःच्या मोबाईल मधील नेटवर्क न वापरता अन्य व्यक्तीच्या मोबाईलचे वा वायफायचे नेटवर्क वापरून गाडी बुक करीत होता. या शिवाय दर वेळी गुन्हा करीत असताना सिमकार्ड बदलत होता. त्याने विवाह जमावणाऱ्या संस्थेतही स्वतःचे नाव करण गुप्ता असे रजिस्टर केले होते. त्यानं नोडल ऑफिसर म्हणून सिम कार्ड कंपनीत काम केलेलं आहे.


आरोपी हा विवाह जुळवणाऱ्या संस्थेतून विवाह इच्छुक महिलांशी संपर्क करून त्यांना मॉल, मोठे हॉटेल्स अशा आलिशान ठिकाणी बोलवत होता.  तिथे त्यांच्याशी लगट करत होता. अशाच प्रकारे त्याने पुण्यातील एका महिलेशी संपर्क साधला. तिला नवी मुंबईत बोलावून घेतले, नवी मुंबईत दोघांनी जेवण केले.  त्याने सदर महिलेस लॉजवर राहू असे सांगितले. मात्र महिलेने नकार दिल्यावर टॅक्सीतून जाताना त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने नकार देत खाली उतरली. हा प्रकार पाम बीच एपीएमसी येथे घडला. त्यावेळी तिने तडक एपीएमसी पोलीस ठाणे गाठून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला. याबाबत सलग चार महिने पोलीस तपास करत होते. अखेर तांत्रिक तपासात आरोपी हा मालाड येथे असल्याचे समजल्यावर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.


या आरोपीने 10 ते 15 महिलांची अशीच फसवणूक केली असून जर आणखी कुण्या महिलेस या आरोपीचा असा अनुभव आला असेल तर त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी केले आहे.