Seasons Coldest Temperature in Mumbai : मुंबईत हुडहुडी वाढली आहे. मुंबईत यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) , मुंबईत आज सकाळी पारा 13.8 अंशावर पोहोचला आहे. हे यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निच्चांकी तापमान आहे. मुंबईत 15 ते 17 जानेवारी दरम्यान थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये वर्तवला होता. त्यानुसार, मुंबईतील तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. 


मुंबईत रविवारी दिवसाच्या कमाल तापमानामध्येही घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान 26.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यात आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान 25 डिसेंबर रोजी 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. त्यानंतर आज 13.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.


पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम


राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील तीन दिवस मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांत थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यभरात सरासरी 14 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. पुणे, नाशिकसह धुळे, जळगावमध्ये पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज


मुंबईत प्रदूषणात मोठी वाढ


मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही वाईट स्थिती गेली आहे. मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईतील तापमानात घट झाल्यानंतर शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी कमालीची घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्यापुन्हा एकदा डोकं वर काढू शकतात. मुंबईतील किमान तापमानात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी अशी नोंद बघायला मिळाली आहे. मुंबईतील किमानतापमान 13.8 अंशांवर गेल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा अत्यंत वाईट स्थिती  गेल्याची बघायलामिळाली. दिल्लीपेक्षाही जास्त मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावल्याचं सफरच्या नोंदीनुसार पाहायला मिळालं. 


हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही ढासळली


मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 322  वर होता. तर दिल्लीतील सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 221 वर बघायला मिळालं. राजधानी दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा अधिक खराब झाल्याचं आकडेवारीवरुन दिसतेय. पुढील काही दिवसात मुंबईच्या हवेची पातळी सुधारली नाही, तर आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढू शकते.