मुंबई : आज 6 मे राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले, त्या घटनेला 99 वर्षे होत आहेत. पुढच्या वर्षी या घटनेला शंभर वर्षे होणार आहेत. मात्र, शाहु महाराजांनी शेवटचा श्वास जिथे घेतला. ते ठिकाण म्हणजे 'पन्हाळा लॉज'. मात्र, हे ठिकाण मुंबईत नेमकं कुठे आहे? याची कुणालाही माहिती नव्हती. इतकी वर्ष हे ठिकाण दुर्लक्षित राहिलं. आता महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते पैलवान संग्राम कांबळे यांनी गेली 3 वर्षे अथक संशोधन करुन जिथे पन्हाळा लॉज होता. त्या गिरगाव, खेतवाडी मधील गल्ली क्रमांक 13 इथे स्वतः जाऊन या जागेचा शोध घेतलाय.


तिथे राहणाऱ्या अनेक जुन्या वयोवृध्द माणसांना त्यांनी याबाबत विचारले. काही जुन्या काळातील वयोवृद्ध मंडळींनी पन्हाळा लॉजच्या जुजबी आठवणी सांगितल्या आहेत. ही जागा अनेकांनी विकत घेतली. नवीन इमारती बांधल्या, पाडल्या गेल्या. आज इथे मोठी इमारत उभी आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील पुरातत्व विभागामध्ये जाऊन त्या जागेची पक्की खात्री करून तसेच त्या जागेवर पूर्वी काय होतं याची शहानिशा करून त्यांनी हे ठिकाण शोधले आहे.


छत्रपती शाहू महाराजांचं 120 वर्षापूर्वीचं आपत्ती व्यवस्थापन; वैद्यकीय सुविधा नसतानाही कसा केला प्लेगच्या साथीचा सामना?
 
बृहन्मुंबई पुरातत्व विभागाकडे या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती जपण्यासाठी महानगरपालिकेतर्फे नील फलक तसेच त्या रोडला छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं नाव देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी इतकी वर्ष झाली तरी छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे स्मृती जतन करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पुरातन विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तसेच महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघामार्फत येत्या काळात छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं गेलंय.