मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल एक हजार 767 कोटी रुपयांची असल्याचा दावा काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला.


सिडकोच्या ताब्यातील जागेची किंमत तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असताना ती फक्त तीन कोटी रुपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुंबईत काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. यावेळी संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी हे नेते उपस्थित होते.

कोयना धरणाच्या आठ प्रकल्पग्रस्तांना दिलेली 24 एकर जमीन प्रति एकर 15 लाख दराने बिल्डरने विकत घेतली. यामध्ये मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.

हे बिल्डर भाजपचे विधानपरिषद आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र असल्याचं सांगत ते भागीदारही असण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे.

14 मे रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं. त्याच दिवशी जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बिल्डर्सना मिळाली. या प्रक्रियेला दीड वर्ष लागत असताना 24 तासात हे कसं शक्य झालं, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानेच हा व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फडणवीस हे 'क्लीन चिट मिनिस्टर' असून सर्वांना 'क्लीन चिट' देत असल्याचं सुरजेवाला म्हणाले.