मुंबई : मुंबईत कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असं या मुलाचं नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली.


शिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4 वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला. स्थानिकांनी त्याला राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

पाच बहिणींमध्ये हा एक भाऊ असल्याने तो सगळ्यांचा लाडका होता. त्याचे वडील दुबईला नोकरी करतात. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहेच. परंतु इथून ये-जा करणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकबाबत स्थानिक जनतेमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या या विभागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.