Mumbai Crime News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी (Riyaz Bhati) याला मुंबई गुन्हे शाखेच्या AEC (Anti Extortion Cell) नं अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचा नातेवाईक सलीम फ्रूट (Salim Fruit) यांनं अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी वाहनं आणि पैसे उकळले होते. याच प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकानं रियाज भाटी याला अंधेरी परिसरातून अटक केली आहे. क्राईम ब्रँचचा (Crime Branch) हा तपास पुढे नेण्यासाठी आता सलीम फ्रुटच्या कोठडीची गरज असून, त्यासाठी गुन्हे शाखेनं एनआयए कोर्टात अर्ज दाखल केला आहे.


मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या जवळच्या रियाझ भाटीला एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी अटक केली. आज (मंगळवारी) पोलीस रियाज भाटीला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. गँगस्टर छोटा शकील यांचा साडू सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुच वय 50 वर्षे आणि रियाझ सिराज भाटी, वय 54 वर्षे यांनी वर्सोवा येथील फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणीस्वरूपात 30 लाखांची रुपयांची महागडी गाडी आणि 7.50 लाख रुपये रोख रक्कम उकळली होती.


रियाझ सिराज भाटी यास अंधेरीतून ताब्यात घेण्यात आलं असून अटक करण्यात आली आहे. डी कंपनीशी संबंध असल्याबद्दल एनआयएनं सलीम फ्रुटला अटक केल्यानंतर वर्सोव्यातील तक्रारदार आणि व्यावसायिकानं खंडणी विरोधी कक्षाशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती देणारी लेखी तक्रार दिली. त्यानुसार 26 सप्टेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आता तुरुंगात असलेल्या सलीम फ्रुटलाही ताब्यात घेणार आहेत. तर रियाझ भाटीला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. वर्सोवा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोण आहे रियाझ भाटी? 


रियाझ भाटी हा गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला गुंड असून त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक आणि गोळीबार अशा अनेक प्रकरणांमधील गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती.


जुलै 2021 मध्ये गोरेगाव येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह भाटी यांचेही आरोपी म्हणून नाव होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटी हा वाझेच्या वतीनं बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे गोळा करत होता.