मुंबई: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरातील बहुचर्चित एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्प वाचवावा यासाठी 23 वेगवेगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या संदर्भात राज्यपालांनी लक्ष द्यावं अशीही विनंती या गटाने केली आहे.
कफ परेड परिसर देशातील सर्वात महागडा परिसर म्हणून ओळखला जातोय. या परिसरात एकीकडं अलिशान बिल्डिंग, हॉटेल्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नेव्ही बेस अशा इमारती आहेत तर दुसरीकडं मुंबईचे मूळ निवासी समजल्या जाणाऱ्या मासेमाऱ्यांच्या 7000 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. 28 एकरच्या परिसरातील या प्रोजेक्टमध्ये 30 मजली इमारतींचे अनेक टॉवर्स असतील.
शापूरजी पालनजी ग्रुपच्या मालकीच्या प्रिकॉशन्स प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रस्तावाला 2018 साली राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. परंतु या निर्णयाला स्पर्धक कंपनी आणि या परिसरातील एक स्थानिक संघटनेनं आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबतल ठरवलं आणि प्रिकॉशन्स प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पुरेशी आर्थिक क्षमता आहे आणि त्याला स्थानिकांचं समर्थन असल्याचं सांगत या प्रोजेक्टचा मार्ग मोकळा केला.
नंतरच्या काळात आणखी एका व्यक्तीने हा प्रकल्प लष्करी क्षेत्राच्या 500 मीटरच्या आत येतो अशी तक्रार केली. तेव्हापासून हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडला आहे. आता हा प्रकल्प वाचावा यासाठी पु्न्हा एकदा 23 वेगवेगळ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या गटाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :