मुंबई : काँग्रेसनं हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्याचा आटापिटा सुरु केला आहे. कारण आधी पक्षाचा संत-महंत कक्ष बनवला, आणि आज साधुसंतांची बैठक घेऊन संत-महंत काँग्रेस सेलची स्थापना केली आहे. पण यावरुन काँग्रेसमध्यच दुफळी पडली आहे.

काँग्रेसची हिंदू प्रतिमा बदलण्याच्या उद्देशानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आधी हिंदू संत-महंत कक्ष स्थापन करण्यात आला होता. त्यानंतर आज साधू संतांची बैठक घेऊन संत-महंत महासभेची स्थापना करण्यात आली. मुंबईतल्या सांताक्रूझमध्ये ही बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.

या महासभेच्या माध्यमातून मंदिरांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यास काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल, असं यावेळी निरुपम यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना निरुपम यांनी महात्मा गांधीजींच्या बैठकीचा दाखला देऊन सांगितलं की, ''धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेसची जी हिंदू विरोधी प्रतिमा तयार करण्यात आली. ती तोडण्यासाठी या महासभेची स्थापना केली आहे. काँग्रेसचे पदाधिकारी हिंदूविरोधी नाहीत.''

निरुपम यांच्या भूमिकेवरुन पक्षातच दुफळी माजल्याचं चित्र आहे. कारण, काँग्रेसचे नेते आणि नसीम खान यांनी यांनी संत-महंतांच्या बैठकीला विरोध केला आहे. नसीम खान म्हणाले की, ''मुंबई काँग्रेसच्या नावाखाली संत-महंतांच्या सेलची स्थापना करणं अश्चर्यकारक आहे. तसेच याप्रकरणी दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वाशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.''

दरम्यान, भाजपनंही काँग्रेसच्या या अजेंड्याला विरोध केला आहे. मुंबई भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. संजय निरुपम आणि काँग्रेसनं स्वातंत्र्यलढ्याचं श्रेय घेऊ नये, असं लाड म्हणाले आहेत.