पाकशी चर्चेचा फायदा नाही, आता आरपारच्या लढाईची वेळ : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 18 Sep 2016 10:18 PM (IST)
मुंबई : पाकिस्तानशी चर्चा करुन काहीच फायदा नाही. आता आरपारच्या लढाईची गरज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उरी हल्ल्याबाबत बोलताना म्हटलं आहे. शिवाय, आता अॅक्शनची गरज असल्याचेही ते म्हणाले. "उरी हल्ला हा देशावरील मोठा हल्ला असून, सैनिकांवर आतापर्यंत एवढा मोठा हल्ला झाला नव्हता. शिवाय, आता चर्चा करुन काहीच फायदा नाही. इशारा देणं किंवा धमकी देणं, इथून ठिक आहे. पण आता आता अॅक्शनची गरज आहे.", असे संजय राऊत म्हणाले. "पठाणकोटमध्ये हल्ला होतो, उरीमध्ये हल्ला होतो, आणखी काही ठिकाणी हल्ला होतो. आपण कधीपर्यंत डोळे बंद करुन हे हल्ले सहन करणार आहोत?" असा सवाल राऊत यांनी केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या मुख्यालयावर आत्मघाती हल्ला झाला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला. यामध्ये भारताचे 17 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यातील चारही दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.