मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यानंतर घोसाळकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे हे सरकारी पैशाने गुंड आणि माफियांना बळ देण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, मंत्रालय आणि नागपूरच्या विधानभवनात अनेक गुंड एकनाथ शिंदे आणि त्यांचे बाळराजे श्रीकांत शिंदे यांना भेटून गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला ठाणे ते मुंबईपर्यंत अभिनंदनाचे बॅनर्स लावणारे बहुतांश लोक गुंड आहेत. या गुंडांना सरकारी कंत्राटे दिली जात आहेत. या सरकारच्या काळात पोलीस हे गुंडांचे संरक्षक झाले आहेत. शिंद्यांच्या टोळीत गुंड आणि पोलीस एकत्र काम करतात. मुंबई आणि ठाण्यात नेमणूक करण्यात आलेले पोलीस हे खाकी वर्दीतील शिंदे सेनेचे सदस्य आहेत. या सगळ्यांची यादी तयार आहे. त्यांचा हिशेब २०२४ नंतर केला जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अपयशी आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री: संजय राऊत
अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राज्यातील गुंडांचा हा नंगानाच अस्वस्थता निर्माण करणार आहे. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. रोज गुंडगिरीच्या घटना समोर येत आहेत. अशावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? गृहमंत्री अदृश्य आहेत. अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे? गृहमंत्री विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत 'चाय पे चर्चा' करत फिरत आहेत. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची चर्चा कोण करणार? अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस हे अकार्यक्षम आणि अपयशी गृहमंत्री असल्याचे सिद्ध झाले आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद हे फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकायला आणि भाजपची भूमिका मांडण्यासाठी दिले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रावर सूड उगवत आहेत: संजय राऊत
महाराष्ट्रात वाढत असलेली गुन्हेगारी हे अपयश नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अपयश आहे. त्यांनी हे माफियाराज महाराष्ट्रावर लादले आहे. मोदी आणि शाह यांनी हा महाराष्ट्रावर उगवलेला सूड आहे. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मोदी-शाह यांचे आहे. मोदी आणि शाह हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रात रोज पडणारे रक्ताचे सडे आणि गुन्हेगारी वाढण्यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांनीच हे माफियाराज महाराष्ट्रावर लादले आहे. मग आता ते काय करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
कोण आहे मॉरिस नोरोन्हा? घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या, त्यानंतर स्वत:लाही संपवलं