Sanjay Raut PC : केंद्राच्याच मदतीनं देशाबाहेर पळून जाता येतं, संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच परमबीर सिंह सध्या कुठे आहेत? अशा चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 


अनिल देशमुखांना ईडीकडून झालेल्या अटकेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दुर्दैवी आहे, अनिल देशमुख एक न्यायालयीन लढाई लढत होते. ती लढाई अद्याप संपलेली नाहीये. अनिल देशमुखांची अटक ही कायद्याला आणि नितिमत्तेला धरुन नाही. अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करणारे लोक आहेत, ते आरोप करुन पळून गेलेले नाहीत. त्यांना पळून लावलेलं आहे. कोणीही देशाबाहेर पळून जातो, तो केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच पळून जाऊ शकतो. मुंबई पोलीस खात्याचा आयुक्त असलेले, महासंचालक दर्जाचा अधिकारी जेव्हा हा देश सोडून जातो. तेव्हा त्याला संपूर्ण पाठबळ हे केंद्रीय सत्तेचं असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही. त्यांनी आरोप केले आणि ते पळून गेले. त्या आरोपांच्या आधारावर केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात आणि महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अटक केली जाते. चौकशी होऊ शकते, तपास होऊ शकतो. पण पहिल्याच ईडीच्या चौकशीवेळी त्यांना अटक केली जाते."  


"मला असं वाटतं हे सगळं ठरवून चाललं आहे. महाविकास आघाडीच्या संदर्भातील प्रमुख लोक आहेत. त्यांना अशाप्रकारे त्रास द्यायचा, बदनाम करायचं. त्यांच्यावर चिखलफेक करायची. आजही अजित पवारांच्या परिचयातील काही लोकांवर धाडी पडल्यात, मालमत्ताही जप्त केल्यात. भारतीय जनता पक्षाचे लोक जंगलात राहतात का? ते कुठे राहतात? त्यांची काहीच संपत्ती नाही का? त्यासंदर्भातील माहिती आम्हीही दिलेली आहे ईडीकडे. त्याला अद्याप हात लागलेला नाही. त्यांची बायका-मुलं ही कुटुंब आणि आमची काय रस्त्यावर आहेत? हे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरु केलेलं आहे. महाराष्ट्रात राजकारणात कायम चांगलं राजकारण होतं, ते बिघडवलंय. तसेच याची जबाबदारी भाजपवर आहे. आज ते टनाटना उड्या मारत आहे, हे सगळं पाहून. पण एक दिवस त्यांना तोंड लपवण्याची वेळ येईल."


देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर बोलताना दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "काही लोक म्हणतायत दिवाळीनंतर आम्ही असं करु, तसं करु. यांना घरातून नाही, हे स्वतःची तोंड बाथरुममध्ये लपवून बसतील, असे गौप्यस्फोट आम्ही करु शकतो. पण त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचं का? आम्हाला आमच्या नेत्यांनी हे शिकवलं नाही, राजकारणात."