parambir singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनमिया यांवा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी संजय पुनमिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे पुनामिया यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी 2016 साली दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणी श्यामसुंदर अग्रवाल, मुरलीधर अग्रवाल, मनोज पुरोहित, रतीलाल जैन यापैकी तिघांना अटक करण्यात आली होती. मार्च 2017 साली याप्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यामध्ये संजय पुनामिया हे साक्षीदार होते. पाच वर्षानंतर ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलं की, या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा. त्यानुसार ठाणे पोलिसांनी याचा पुन्हा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी साक्षीदारांनाच ताब्यात घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनी तथ्य न तपासताच गुन्हा दाखल केल्याचा दावा करत संजय पुनामिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी ऍड नितीन प्रधान व ऍड दिलीप शुक्ला यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या सुट्टीकालीन कोर्टासमोर सुनावणी घेण्यात आली.
त्यावेळी वकील नितीन प्रधान यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून यात आरोपपत्रही दाखल झालं आहे. तरी देखील पोलीस जाणून बुजून कारवाई करीत आहेत. मात्र राज्य सरकारच्या वतीनं वकील शेखर जगताप यांनी युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की, आरोपीनं परमबीर यांची मदत घेऊन बराच गैरफायदा घेतला आहे. त्यांनी या प्रकरणात इतरांना अडकवले व स्वतः साक्षीदार बनून ते या प्रकरणापासून मात्र नामोनिराळे राहिले. तसेच अटक टाळण्यासाठी आजारी असल्याचं कारण देत ते आता खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी परमबीर सिंह यांच्या काळात पोलिस बळाचा गैरवापर केला आहे. न्यायालयानं राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी संजय पुनामिया यांना दिलासा देण्यास नकार देत अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावली.