मुंबई : दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना गोड बातमी मिळणार आहे. 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे प्रत्यक्ष खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण ही कर्जमाफी शिवसेनेमुळेच झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


कर्जमाफीचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरपासून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. तर उर्वरित शेतकऱ्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत पैसे दिले जाणार आहेत. पण ही कर्जमाफी आम्ही सरकारच्या मागं लागून मंजूर करुन घेतली, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, “कर्जमाफीवर शेतकरी समाधानी झाला, तर शेतकरी स्वत:हून सरकारचं अभिनंदन करेल. पण कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलन करुन, सरकारला हा निर्णय घ्यायला लावला,” असा दावा यावेळी केला.

शिवाय, कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकरी चाचपडतो आहे. या पिळवणुकीवर शेतकरी खुश नाही. त्यामुळे सरकारनं दिवाळीपर्यंतचं जे वचन दिलं आहे. त्याकडे आमचं लक्ष असल्याचंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

कर्जमाफीची घोषणा

राज्यातील शेतकऱ्यांचं सरसकट दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 24 जून रोजी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असं या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून, त्याचा लाभ 89 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा, राज्य सरकारने केला होता.

शिवाय, कर्जमाफीमुळे 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल आणि उर्वरित 6 टक्के शेतकऱ्यांच्या कर्जाच्या परतफेडीत दीड लाख रुपये राज्य सरकारचा वाटा असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम (25 हजार रुपये कमाल मर्यादा) अनुदान म्हणून दिलं जाणार आहे.

तर आजी-माजी मंत्री, क्लास वन अधिकारी, करदाते आणि व्हॅट भरणारे व्यापाऱ्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

काही शेतकऱ्यांचीच दिवाळी, इतरांनी कर्जमाफीची वाट पाहा!

अखेर कर्जमाफीला मुहूर्त, 18 ऑक्टोबरपासून थेट खात्यात पैसे : सूत्र

कर्जमाफीसाठी राज्यभरातून 77 लाख अर्ज


शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर


34 हजार कोटींची कर्जमाफी…

कुठल्या राज्यात किती कोटीची कर्जमाफी?