मुंबई : नऊ वर्षांपूर्वी दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या पतीला अखेर नुकसानभरपाई मिळणार आहे. मुंबईतील अंधेरी उड्डाणपुलावर 2008 मध्ये झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडून 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता.


मयत तरुणीचा पती विवेक साटमला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मोटार दुर्घटना दावा न्यायाधिकरणाने इन्शुअरन्स कंपनी आणि ट्रक मालकाला दिले आहेत.

अनघा साटम कार्ल्सबर्ग कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह होती. 2008 मध्ये दुचाकीवरुन जाताना अंधेरीतील फ्लायओव्हरवर झालेल्या अपघातात ट्रकखाली चिरडून तिचा मृत्यू झाला होता.

सध्या 37 वर्षांचा असलेला अनघाचा विधुर पती अपघाताच्या वेळी बेरोजगार होता आणि पत्नीवरच आर्थिकदृष्ट्या अवलंबून होता. त्यामुळे लैंगिक भेदाभेद न करता प्राधिकरणाने तिच्या पतीला भरपाई देण्यास सांगितलं आहे.

आपल्या दुचाकीस्वार पत्नीला बाबुराम अगरवाल यांच्या लॉरीने चिरडलं. गंभीर जखमी झालेल्या अनघाचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, असं विवेकने 28 डिसेंबर 2012 रोजी सांगितलं. ट्रक चालकाने बेदरकार वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचं प्राधिकरणाने सांगितलं.

पीडिताचं वय, उत्पन्न यासारख्या गोष्टींचा विचार यावेळी करण्यात आला. मृत्यूवेळी तिचा मासिक पगार 45 हजार रुपये असून तिचं प्रमोशन अपेक्षित होतं. त्यानंतर तिचा पगार वार्षिक 35 ते 40 लाख रुपयांच्या घरात पोहचला असता.

विवेक पत्नीवर अवलंबून असल्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, असं प्राधिकरणाने स्पष्ट केलं. 71.6 लाखांवर सात वर्षांचं 7.5 टक्क्यांनुसार व्याज धरुन एक कोटी रुपयांची रक्कम ठरवण्यात आली.