Sanjay Raut :  ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात, सैन्य नाही. तुघलकानेही असा निर्णय घेतला नसता, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. देशाचं रक्षण कुणी करायचं हे ज्यांना कळत नाही त्यांच्या हाती सत्ता आहे. ठेकेदारी पद्धतीनं सैन्य नाही तर गुलाम नेमले जातात, असं ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या (Shiv Sena Vardhapan कार्यक्रमात ते बोलत होते. 


56 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठिणगी टाकली. त्या ठिणगीचा आज देशभर वणवा झाला असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आज फादर्स डे आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप असल्याचे राऊत म्हणाले. जगात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे त्यांच्या मनातला बाप बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, असं ते म्हणाले. 


संजय राऊतांनी म्हटलं की, शिवसेनेचा बाणा हा स्वाभिमानाचा, राष्ट्रीय, मराठी, अन्यायाविरुद्ध लढण्याचा बाणा आहे. हा बाणा सर्वांच्या छाताडावरती उभा राहिलं. अंगावर आलात तर फक्त शिंगावर घेणार नाही तर तुडवून लावू, असा इशारा संजय राऊतांनी दिला.  


राऊत म्हणाले की, राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळं महाराष्ट्र शांत आहे. हे राज्य सर्वांना एकत्र करुन चालवावं लागेल, कपट कारस्थान करुन राजकारण होणार नसल्याचे राऊत फडणवीसांना उद्देशून म्हणाले. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं असं नाही. फार घमेंड करु नका, असं ते म्हणाले. 
 
संजय राऊतांनी म्हटलं की, राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. एक जागा जिंकली म्हणजे जग जिंकलं नाही. राज्याची सुत्रं ही उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील, फार घमंड करु नका. 'तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है', असे म्हणत राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. बादशाहीला नख लावण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असं ते म्हणाले. 


शिवसेनेचा इतिहास हा अन्यायाविरोधात ठिणगी टाकण्याचा आहे. शिवसेना न्यायाच्या लढ्यात नेहमीच पुढे असते. शिवसेनेचा स्वाभिमानाचा बाणा हा सगळ्यांच्या छाताडावर पाय देऊन उभा आहे. जे आज शिवसेनेविरुद्ध बोलत आहेत, ते काही काळाने शिवसेनेच्या पायाशी असतील, असंही राऊत म्हणाले.