मुंबई : आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाईट केले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. देशभरात किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हे केले जातील असंही ते म्हणाले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  


खासदार संजय राऊत म्हणाले की, "हे आजचे शक्तीप्रदर्शन नाही तर लोकांच्या मनातली चिड आणि संताप आहे. आएनएस विक्रांतचा घोटाळा झाला त्याच्या विरोधात आज शिवसैनिकांनी आंदोलन केलं. आज झालेले हे शक्तीप्रदर्शन नाही तर लोकांच्या भावना आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल आज गावपातळीवर चिड आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हल्ला करत आहे."


सोमय्यांच्या मुद्द्यावरुन राज्यसभा स्थगित
संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा केले आणि पीएमसी बँकेच्या माध्यमातून किरीट सोमय्यानी ते व्हाईट केले. सोमय्यांच्या घोटाळ्यावर आज राज्यसभेचं कामकाज स्थगित झालं, भाजपचे खासदारसुद्धा यावर बोलू शकले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील. 


तुम्ही तुमची कबर ही महाराष्ट्रात खोदली आहे, आता ही कबर देशातही खोदली जाईल असं संजय राऊत भाजपला उद्देशून म्हणाले. सोमय्या त्यांच्या आरोपावर उत्तर देत नाहीत याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं स्पष्ट आहे असंही ते म्हणाले. 


शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन
बुधवारी ईडीने कारवाई करत संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. त्यानंतर संजय राऊत आज दिल्लीवरुन मुंबईत आले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेने आज शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसत होतं. 


महत्त्वाच्या बातम्या: