मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो असं म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत यांचे एक ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. 'चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तर रोकोगे' असं म्हणत त्यांनी थेट भाजपला आणि ईडीला आव्हान दिलं असल्याची चर्चा आहे. 


शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर संजय राऊतांनी एक ट्वीट केलंय. त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की, "मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेंकोगे! चुन चुन कर आगे बढूंगा मै, तुम मुझको कब तर रोकोगे!!"


 




'तुम्ही मला कुठपर्यंत अडवणार' असं थेट आव्हान संजय राऊत यांनी भाजपला आणि ईडीला दिलं असल्याचं सांगितलं जातंय. 


ईडीच्या कारवाईनंतर काय म्हणाले संजय राऊत? 
ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत म्हणाले की,  ईडी असो वा सीबीआय माझ्या मागे लागली आहे याची कल्पना मला होती. ईडीने केलेल्या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव होता. त्यांना जर मदत केली नाही तर माझ्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील अशी माहिती होती. 


आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो
खासदार संजय राऊत म्हणाले की, "या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते, आता होत आहेत. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, मी शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही. इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही."


संबंधित बातम्या: