नवी मुंबई : महापे एमआयडीसीमध्ये सकाळी लागलेल्या आगीत झाडे जळून खाक झाली आहेत. तर येथील काही झोपड्यांचेही नुकसान झाले आहे. या भागातून डीझेलची भूमिगत वाहिनी गेली आहे. या भूमीगत वाहिनीतून झालेल्या डिझेल गळतीमुळे ही आग लागली होती. भारत पेट्रोलियमच्या आधिकाऱ्यांनी तपासणी केली असता पाईपलाईनला पाडलेले छिद्र आढळले. त्यामुळे येथून कुणीतरी डिझेल चोरी करत असून या गळतीमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या माध्यामातून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
महापे येथील शिळफाटा रस्त्यावर अडवली भुतावळी गावानजीक जंगलात ही आग लागली. याच ठिकाणी भूमिगत डिझेल वाहिनी असून त्यातून गळती झालेल्या डिझेलवर ठिणगी पडून सदर आग लागली. सध्या उन्हाळा असल्याने परिसारातील झाडे वाळलेली असल्याने झाडांनीही पेट घेतला तर जवळच असलेल्या काही झोपड्याही आगीच्या भक्षस्थानी पडल्या. तसेच या परिसरात वखार गोडाऊन मधील सामान वेळीच हलवल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नाही. आग विझवण्यासाठी सिडको , कोपरखैरणे, ऐरोली, ठाणे, रबाळे व पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. आग डिझेलमुळे लागल्याने आग विझवून देखील पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने अखेर फोम मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यावेळी 38 अधिकारी , कर्मचारी यांना आग विझविण्यासाठी पाच तास प्रयत्न करावे लागले असल्याचे एमआयडीसीचे फायर अधिकारी रायबा पाटील यांनी सांगितले.
येथे भूमिगत असालेली डीझेल वाहिनी ही मुंबई - दिल्ली असून भारत पेट्रोलियम कंपनीची आहे . आगीची घटना कळल्यावर त्यांचीही रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी त्यांनी पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने डिझेल वाहिनीला छिद्र करून डिझेल चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. याच छिद्रातून डिझेल थेंब थेंब झिरपत होते जे नजीकच्या नाल्यापर्यंत पोहचले होते. त्यामुळे आग विझवण्यास पाण्याऐवजी फोम वापरावे लागले.
संबंधित बातम्या :
Jalgaon : अवकाशातून उपग्रहाचे अवशेष पडून घराला आग, जळगावातील कुटुंबाचा दावा
Nashik : नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्यातील आग अजूनही धुमसतीच, पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha