नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर एबीपी माझाने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला. "बंदूक लावा, हत्या करा, घाबरणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.


संजय राऊत काय म्हणाले? 





"मला पूर्ण कल्पना होती की ईडी माझ्या मागे लागणार, सीबीआय लागणार, ज्या पद्धतीने आम्ही सरकार स्थापन केलं, मी व्यंकय्या नायडूंना पत्रही लिहिलं आहे, माझ्यावर दबाव येतोय, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आहे, दबाव टाकणाऱ्यांना मदत केली नाही तर तुमच्या मागे केंद्रीय यंत्रणा लागतील, तुम्हाला अटकही करु असं पत्र मी नायडूंना लिहिलं होतं. 


मला कारवाईचं आश्चर्य वाटत नाही. अशा कारवाईने शिवसेना किंवा संजय राऊत खचले आहेत असं वाटेल, पण सूडाच्या कारवाया, असत्यासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही, झुकणार नाही. 


आज जे ते काय सांगत आहेत, ते आम्ही कष्टाच्या पैशातून घेतलं आहे. घर असेल, गावची लहानची जमीन असेल, 2009 मध्ये घेतलीय. भाजपचे नाचे जे नाचतायत ना, हा राजकीय दबाव आहे, एक रुपया जरी भ्रष्टाचाराचा, चुकीचा पैसा माझ्या किंवा माझ्या पत्नीच्या खात्यावर आला असेल तर मी संपूर्ण संपत्ती भाजपच्या खात्यावर जमा करायला तयार आहोत. भाजप हे भिकारी लोक आहेत. यांच्याकडे काही नाही, यांचे जे देणगीदार आहेत त्यांची चौकशी ईडीने करायला हवी. मात्र आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई होतेय. पण आम्हाला काही फरक पडत नाही, अशा कारवाया करत राहायला हवं, महाराष्ट्रतील जनतेला हे कळायला हवं कशा कारवाया सुरु आहेत. 


राहत्या घरावर कारवाई हा सूड आहे, घरातून बाहेर काढलं हा सूड आहे.. म्हणजे हा सूड मराठी माणसावर घेतला जात आहे, मुंबईमध्ये.. इतकं खालचं राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं.. कायद्याने राहतं घर जप्त करता येत नाही.


2009 मधील जमिनीवर कारवाई होतेय... दादरमधील जागेच्या व्यवहाराबाबत राज्यसभेच्या प्रत्येक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे.आमच्यावर 55 लाख कर्ज असल्याचं दाखवलं.. प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून ते कर्ज होतं, ते पैसे परतही गेले त्याबाबत इन्कम टॅक्सला कळवलं. 


पत्राचाळ काय आहे हे मला माहिती नाही. सिद्ध करायचंच आहे त्यांना त्यामुळे चार्जशीटमध्ये काहीही टाकू शकतात.. मेहुल चौकशी हे पंतप्रधानांसोबत परदेश दौऱ्यावर गेले तर आम्ही पंतप्रधानांशी नाव जोडायचं का? तुम्ही कोणतंही नाव जोडत असाल तर नीट अभ्यास हवा.. मी त्यात पडत नाही, जे पडतायत त्यांना पडू द्या, ते तोंडावर आपटतील.. 


या देशात खोट्या केस, खोटे पुरावे कधी निर्माण झाले नव्हते आता होत आहेत.


कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही करुच.. शेवटी आमच्या कष्टातून, घामाच्या पैशाने घेतलेल्या जागा आहेत. महाराष्ट्र मला ओळखतो, पक्ष मला ओळखतो, बाळासाहेब मला ओळखायचे, शरद पवारांनी आताच फोन केला, मुख्यमंत्र्यांचा फोन होता, माझे सगळे सहकारी फोन करत आहेत.. 


सुडाचे राजकारण, बदल्याचं राजकारण, तुमचं सरकार माझ्या प्रयत्नामुळे आलं नाही, हे सरकार पडत नाही म्हणून मला अडकवत असाल तर जरुर अडकवा. 


यातील एक आरोप जरी सिद्ध झाला, तर मी राजकारण समाजकारण सोडेन, उरलेली प्रॉपर्टी भाजपच्या नावावर करेन. 


माझं कुटुंब राहतं, दादरला होते.. या देशात केंद्रीय यंत्रणा इतक्या बेकायदेशीरपणे काम करत आहे., त्यामुळेच उद्धवजी विधानसभेत म्हणाले मला अटक करा..


आम्ही सगळे कुटुंबीय खंबीर आहोत, मराठी शब्दात बोलायचं झाल्यास आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा, मर्द मराठी माणूस आहे.. काय कराल तुम्ही,, इथे बंदूक लावाल ना तुम्ही, हे ईडी सीबीआय भाडोत्री भाजपने लावलं आहे ना, या खोटेपणाला संजय राऊत घाबरत नाही. तुम्ही तुमची कबर खोदायला सुरुवात केली आहे, जे खोटं कराल ते तुमच्यावर उलटवल्याशिवाय राहणार नाही..


प्रॉपर्टी करणं हा आमचा धंदा नाही, तो तुमचा आहे. पण महाराष्ट्रात जर कष्टाने, हक्काने दोन गोष्टी कोणी घेत असेल, त्यावर हे अमराठी लोक आक्षेप घेत असाल तर मुंबई मराठी माणसाची आहे, दामदुपटीने वसूल करु. 


व्यवहार पाहायला हवा, आम्हाला विचारायला हवं, ते न करता तुम्ही ठरवता, तुम्ही कोण ठरवणार? तपास केला का? कायद्याने अमर्याद अधिकार दिले आहेत त्याचा गैरवापर करता, करु द्या... या देशात सैतानाचा, राक्षसांचा अंत झाला..रावण कंस अबजल खान, सगळे मरण पावले, कोणी जिवंत नाही.. मी लढणारा माणूस आहे, प्रॉपर्टी संपत्ती गौण आहे. 


माझा पक्ष शिवसेना आणि मला असलेलं लोकांचं समर्थन ही माझी संपत्ती आहे. 


या कारवाईने मी मौनात नाही जाणार ते जातील.. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, माझ्या धमण्यात शिवसेना आहे. काय करणार तुम्ही? माझ्या डोक्याला बंदूक लावाल ना? मी वॉकला जातो, तेव्हा हरेन पंड्याप्रमाणे मला माराल, गोळी माराल.. माझं चॅलेंज आहे, गोळी तुमच्यावर उलटेल.. 


सरकारला धोका निर्माण व्हावा यासाठी संजय राऊतांनी गुडघे टेकावे म्हणून अशा कारवाया सुरु आहेत. 


मी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे ईडी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल त्यावर आता सरकारने SIT नेमली आहे.. 


सगळ्या दबावाखाली आहे. .असत्यमेव जयते, गांधीजी मरण पावले."


 


संबंधित बातम्या