मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाली असून त्यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. "माझी तब्येत ठणठणीत आहे. चार दिवस उपचार केले. हृदयाचा त्रास आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने, लिलावती रुग्णालयातील डॉक्टर यांच्यामुळे मी आता बरा आहे. दोन दिवस विश्रांती घेऊन कामाला लागेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली. सोबतच राजकीय पथ्ये थोडीफार पाळू, असंही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर एक वर्षापूर्वी लिलावती रुग्णालयातच अँजिओप्लास्टी झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्याने पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावरील अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी, छातीत त्रास सुरु झाल्यानं शस्त्रक्रिया
यावेळी संजय राऊत यांनी डॉक्टरांचे, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. सोबतच भाजपलाही चिमटा काढला. डॉक्टरांनी काय सल्ला दिला असं विचारलं असता ते म्हणाले की, "डॉक्टरांनी बरेच सल्ले दिले आहेत. त्यातले शक्य तेवढे पाळू. काम तर करायला हवं, सामना, शिवसेना, संसद, लोकांचं काम करायचं आहे."
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निकालवर काय म्हणाले?
भाजपच्या दु:खात मी सहभागी आहे. आम्हाला नक्की आनंद आहे. निवडणुकीत विजय पराभव होत असतो. भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे बालेकिल्ले ढासळले. महाराष्ट्रातील वारं समजातील सर्व स्तरात बदलल्याचं दिसतं. महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा नाही असं बोलणाऱ्यांनी या निवडणुकीतल्या मतांकडे पाहावं.