मुंबई: ‘अदृश्य हात फक्त सत्ताधाऱ्यांकडे किंवा खुर्चीवर बसलेल्यांकडेच नसतात. तर ते अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात.’ अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘अदृश हाताच्या’ सूचक वक्तव्याला उत्तर दिलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन पुढच्या दशकाचं या कार्यक्रमात ते बोलत होते.


‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला स्पष्ट इशारा दिला होता.

त्यांच्या याच वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘अदृश्य हात फक्त सत्ताधाऱ्यांकडे किंवा खुर्चीवर बसलेल्यांकडेच नसतात. तर ते अदृश्य हात दोन्ही बाजूकडे असतात. देशातील राजकारण अनेकदा अदृश्य हातानीच चाललं आहे. जेव्हा काँग्रेसचं दिल्लीत अल्पमतातील सरकार होतं तेव्हा देखील त्यांना अदृश्य हातांनीच मदत केली होती. महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारांचं बहुमत नसलेलं सरकार जेव्हा-जेव्हा अस्थिर झालं होतं तेव्हा अदृश्य हातानी त्यांना मदत केली होती.’

‘ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्या मागे अदृश्य हातांची मदत असतेच. फक्त तुम्ही त्या अदृश हातांमध्ये काय कोंबता महाराष्ट्राच्या इभ्रतीचा बळी देऊन आणि तिजोरीचा बळी देऊन ते महत्वाचं.’ असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

राज्याचं व्हिजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मश्गुल आहेत. असा पलटवार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केला.

संबंधित बातम्या:

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री