मुंबई: व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची दारं उघडणारी ठरु शकते. अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. याचबाबत मुख्यमंत्र्यांना आज छेडण्यात आलं.


एबीपी माझाच्या 'व्हिजन पुढच्या दशकाचं' या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्याविषयी उत्तर दिलं. 'अशी चर्चा कुठे सुरु असते मला माहित नाही. बहुधा ही चर्चा मला तुमच्या माध्यमातूनच समजते. पण सध्या तरी माझा दिल्लीला जाण्याचा कोणताही प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही तसा प्लॅन ऐकीवात नाही.’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपच्या पार्लमेंटरी बोर्ड अर्थात संसदीय मंडळात व्यंकय्या नायडूंच्या जागी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी राजधानी दिल्लीत चर्चा सुरु आहे. पण मुख्यमंत्र्यांनीच आता हे वृत्त फेटाळलं असून आपण दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

भाजपच्या संसदीय बोर्डात कोणाकोणाचा समावेश?

संसदीय बोर्ड ही भाजपची राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेणारी सर्वात महत्वाची कमिटी आहे. यात सध्या एकूण 12 सदस्य आहेत. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाल्यास ते संसदीय बोर्डातले भाजपचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील. सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे संसदीय बोर्डात आहेत.

अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचा समावेश संसदीय बोर्डात झाला, तरी ते महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवत संसदीय बोर्डाची जबाबदारी पार पाडतील. शिवराजसिंह चौहान यांच्याप्रमाणेच एकाचवेळी ते दोन्ही कामकाज पाहू शकतात.

संसदीय बोर्डातला समावेश याचा दुसरा अर्थ राष्ट्रीय स्तरावर भविष्यातला चेहरा म्हणून पक्ष त्यांना पाहतोय, असाही होतो. त्यामुळेच छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमणसिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा या संसदीय बोर्डात खरंच समावेश होणार का याची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

व्यंकय्यांच्या उमेदवारीमुळे फडणवीस राष्ट्रीय राजकारणात?

LIVE : दिग्गजांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन

सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी : मुख्यमंत्री