मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी राजीनामा दिला आहे. पराभवासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असल्याचं सांगून, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती त्यांनी यावेळ पत्रकारांना दिली.


गेल्या वेळच्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 52 जागांवर विजय मिळवला होता. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 31 ठिकाणीच आघाडी मिळवल्याने पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

यासंबंधी पत्रकारांशी बोलताना, ''पक्षाच्या पराभवासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असून, आपण पदावरुन पायउतार होत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. निरुपम म्हणाले की, ''पक्षातीलच काहीजण निवडणूक प्रचारात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होते. पण तरीही निवडणुकीला सामोरे गेलो. आज मुंबईकरांनी जो निकाल दिला, तो स्वीकारतो आहोत.''

''पक्षातील वाद पक्षाअंतर्गत मिटवण्याऐवजी काही नेते मीडियात नेऊन पक्षाचं नाव बदनाम करत होते. त्यामुळे काहीजणांना पक्षाला हारवायचंच होतं. तसेच पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. यांना वेळीच आवरलं नाही, तर पक्षाचं आणखी नुकसान होऊ शकतं. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.