मुंबई : राज्यातील 10 महापालिका पैकी मुंबई महापालिका तसेच राज्यातील 25 जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभवाचा सामना करावा लागलेल्यांमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेतून बंडखोरी केलेले नाना आंबोले, राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना आमदार सुभाष देसाई, नाशिकमधून शिवसेना खासदार हेमंत गोडसे, राज्याचे पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा यात समावेश आहे.


मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार वॉर्ड क्रमांक 51 मधून भाजपकडून उभे होते. पण शिवसेनेचे उमेदवार स्वप्नील टेंबवलकर यांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 114 मधून शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर गोरेगावमध्ये शिवसेनामंत्री सुभाष देसाई यांना धक्का बसला आहे. त्यांच्या भागातील 7 पैकी 5 जागांवर भाजपने दणदणीत विजय विजय मिळवला आहे.

यासोबतच शिवसेनेतून बंडखोरी केलेले नाना आंबोले यांच्या पत्नी तेजस्वीनी आंबोले यांना लालबागमधून पराभवाचा सामना कारावा लागला. तसेच भाजप प्रवक्ते अतुल शहा यांनाही पराभवचा धक्का बसला. शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर यांनी शहांचा पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 118 मध्ये मनसेतून भाजपवासी झालेले माजी आमदार मंगेश सांगळे यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवार उपेंद्र सावंत यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला.

तर ठाण्यातही शिवसेना खासदार राजन विचारे यांनाही मोठा झटका बसला आहे. त्यांचे पुतणे मंदार विचारे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीतही अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत रावसाहेब दानवे यांची कन्या आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव यांचा पिशोर गटातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. सांगली जिल्हा परिषदेसाठी उभे असलेले सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत यांना पराभव सहन करावा लागला. तर नाशिकमधून शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे यांनाही पराभवाचा धक्का बसला.

विशेष म्हणजे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने परळी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. पण परळी तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकण्यात यश आलं नाही.

सोलापूर महापालिकेत प्रतिष्ठेच्या लढतीत माजी महापौर आरिफ शेख पराभूत झाले आहेत. त्यांनी भाजपच्या चिन्हावर प्रभाग 15 मधून निवडणूक लढवली होती.