सर्जिकल स्ट्राईक निव्वळ बनाव, संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप
एबीपी माझा वेब टीम | 04 Oct 2016 03:00 PM (IST)
मुंबई : सर्जिकल स्ट्राईकबद्दल जोपर्यंत पुरावे मिळत नाही, तोवर संशय कायम राहील. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं पुरावे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक : निरुपम "सर्जिकल स्ट्राईक काँग्रेस सरकारच्या काळातही झाले होते. मात्र, त्याचं कधीच राजकारण केलं नाही. इथे सर्जिकल स्ट्राईकचे पोस्टर लागल्याचे दिसतात.", अशी टीका निरुपम यांनी केली. "56 इंचाच्या छातीने पुरावे सादर करावे" "सर्जिकल स्ट्राईक झाल्याचं मला वाटत नाही. जोपर्यंत सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सादर केले जात नाहीत. तोपर्यंत सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले जातील. त्यामुळे '56 इंचाची छाती' सर्जिकल स्ट्राईकबाबत पुरावे देत नाही, तोपर्यंत शंका कायम राहील.", असे निरुपम म्हणाले. "डीजीएमओच्या पत्रकार परिषदेचीही चौकशी व्हावी" डीजीएमओ रणबीर सिंह यांना कुणी पत्रकार परिषद घ्यायला सांगितली, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही यावेळी संजय निरुपम यांनी केली. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दलच्या पुराव्यांची मागणी केली होती. यापूर्वी पाकिस्तानंही सर्जिकल स्ट्राईक झाली नसल्याचा दावा केला होता. त्यात आता भारतीय राजकारण्यांनी पुरावे मागितल्यानंतर केंद्र सरकार पुरावे देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.