नवी मुंबई : नवी मुंबईचे महापौर आणि आयुक्त यांच्यातील वाद काही संपण्याचं नाव घेत नाही. महापौरांच्या आदेशाची अंमलबजावली महापालिका प्रशासन जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत महापालिकेत पाऊल न ठेवण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला आहे. यामुळे महापौर आणि आयुक्त हे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.


महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिकेतील सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. ते महापौर किंवा सर्वसाधारण सभेतील निर्णयांची अंमलबजावणी देखील करत नाही. ऐरोलीतील आंबेडकर भवनाचा विषय असो किंवा जलमापन यंत्र बसवण्याचा विषय यावरील महापौरांनी जे आदेश दिले आहेत, त्या आदेशांना आयुक्तांनी केराची टोपली दाखवली आहे.

दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही महापौरांच्याच खाद्यावर बंदूक ठेऊन आयुक्तांना टार्गेट केलं जातं आहे. यामुळे महापौर सुधाकर सोनवणे यांची दोन्ही बाजूंनी घुसमट होत असल्याचे दिसून येते आहे. या सर्व प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या महापौरांनी महापालिकेत पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.