मुंबई: अजूनही राष्ट्रवादीसोबत आघाडी व्हावी अशी कुणाची इच्छा नाही, पण राष्ट्रवादीकडून कमी जागांचा प्रस्ताव आला तर आघाडीबाबत विचार करु. असं वक्तव्य काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. मुंबईत आज काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.
मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडी होणार नाही, असं याआधी निरुपमांनी म्हटलं होतं. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा आघाडीबाबत वक्तव्य केलं आहे. 'अजूनही आघाडी व्हावी ही कुणाचीच इच्छा नाही, तरीही कमी जागांच्या मागणीचा प्रस्ताव आल्यास विचार करु शकतो असं इतर नेत्यांचं म्हणणं आहे.' असं निरुपम म्हणाले.
दरम्यान, या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत मात्र गैरहजर होते. गुरूदास कामत यांनी संजय निरूपमांच्या कामांच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून सतत डावललं जात असल्याचा मेसेज मुंबई काँग्रेसमधील सर्व सदस्यांना पाठवला होता. निरूपमांच्या नकारात्मक कार्यपद्धतीमुळे उमेदवार नियुक्ती प्रक्रिया आणि प्रचारातून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या चर्चेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुदास कामत यांनी या बैठकीवरही बहिष्कार टाकला. बैठकीला संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, नसीम खान, चरणजितसिंग सप्रा, अमीन पटेल, अस्लम शेख उपस्थित होते.