मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील दुफळी पुन्हा एकदा उघड झाली आहे. उमेदवारांच्या निवडीवरुन काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम विरूद्ध गुरूदास कामत असे दोन गट पडले आहेत.


गुरूदास कामत यांनी संजय निरूपमांच्या कामांच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली असून सतत डावललं जात असल्याचा मेसेज मुंबई काँग्रेसमधील सर्व सदस्यांना पाठवला आहे. या मेसेजमध्ये निरूपमांच्या नकारात्मक कार्यपद्धतीमुळे उमेदवार नियुक्ती प्रक्रिया आणि प्रचारातून बाहेर पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार निवडीच्या चर्चेसाठी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुदास कामत यांनी या बैठकीवरही बहिष्कार टाकला. बैठकीला संजय निरुपम, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, एकनाथ गायकवाड, नसीम खान, चरणजितसिंग सप्रा, अमीन पटेल, अस्लम शेख उपस्थित होते.

दरम्यान कामतांवर आपण निवडणुकीनंतर बोलू, असं सांगत संजय निरुपम यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. सध्या फक्त भाजप आणि शिवसेनेविरोधात लढणार असल्याचं ते म्हणाले.

राहुल गांधींच्या आदेशानुसार उमेदवार निवडीसाठी एक ठराविक प्रक्रिया बनवण्यात आली आहे. या प्रक्रियेवर कामतांसह सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली असून त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्याही आहेत. त्यामुळे या प्रक्रियेनुसारच उमेदवार निवडले जातील, असं निरुपम यांनी 'माझा'शी बोलताना सांगितलं. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर कामत विरुद्ध संजय निरुपम असा काँग्रेसमधला अंतर्गत वाद पाहायला मिळू शकतो.