मुंबई : मुंबई महापालिकेचं मतदान संपत नाही, तोच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वपक्षावर टीकेची झोड उठवली आहे. मला हरवण्यासाठी काँग्रेसचे नेते राबले, असा सनसनाटी आरोप निरुपम यांनी केला आहे.

माझा पराभव व्हावा, यासाठी काँग्रेसचे नते राबले, असं म्हणत निरुपम यांनी आपल्या पक्षातील नेत्यांवरच आगपाखड केली आहे. संजय निरुपम 'एबीपी माझा'वर बोलत होते.

काय म्हणाले संजय निरुपम ?

काही जणांनी पक्षाच्या विरोधात उघड काम केलं. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे मुंबईकर चांगला निकाल देतील, अशी खात्री आहे. मात्र सर्व नेत्यांनी एकत्रितपणे काम केलं असतं तर पक्षाची कामगिरी चांगली असती, असं निरुपम म्हणाले.

काही जणांनी संजय निरुपमचा पराभव करायचं ठरवलं होतं. मात्र हा माझा वैयक्तिक पराभव नसून पक्षाची हार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. हे करणारे पक्षाचे निष्ठावान नाहीत. त्यामुळे नेत्यांच्या सुंदोपसुंदीचा फटका निकालाला बसणार आहे, असा दावाही संजय निरुपम यांनी केला.

काँग्रेस एक नंबरचा पक्ष व्हावा यासाठी मी काम केलं, पण काही जणांनी शिवसेना-भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन किंवा कोणत्याही कारणाने माझ्याविरुद्ध काम केलं. वर्तमानपत्र किंवा ट्विटरवर माझ्याविरोधात केलेली टीका करणं ही पक्षविरोधी कारवाई, असल्याचंही निरुपम म्हणाले.

संजय निरुपम आणि गुरुदास कामत तसंच नारायण राणे यांच्यातील शीतयुद्ध काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आलं होतं. कामत आणि राणे यांनी प्रचारातून अंगही काढून घेतलं होतं. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीनंतर दोघांनी सहभागी न होण्याचा निर्णय मागे घेतला.