मुंबई : मुंबईसह राज्यभरातील दहा महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. राज्यभरातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र बॉलिवू़डमधील अनेक सुपरस्टार्सनी मतदानाला बुट्टी मारली. आमीर खान, हृतिक रोशन, अनुपम खेरसह अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.
विशेष म्हणजे मतदानाचं आवाहन करणारे आमीर खान, अनुपम खेर, जावेद अख्तर, अक्षय कुमार यांच्यासारख्या अभिनेत्यांनीही मतदान चुकवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नोकरीच्या वेळा सांभाळून सर्वसामान्य मतदारांनी आपला हक्क बजावला असताना बॉलिवूड स्टार्सनी मात्र शूटिंगलाच प्राधान्य दिल्याचं समोर आलं आहे.
कोणकोणत्या बॉलिवूड सेलिब्रेटींची मतदानाला बुट्टी?
आमीर खान - आऊटडोअर शूटिंग
हृतिक रोशन - आऊटडोअर शूटिंग
अनुपम खेर - केपटाऊन
ऋषी कपूर - हाँगकाँग
जावेद अख्तर- शबाना आझमी- बंगळुरु
अर्जुन कपूर - लंडन
संजय दत्त - आग्रा
अजय देवगन - जोधपूर
इम्रान हाश्मी - जोधपूर
दिया मिर्झा - आऊटडोअर शूटिंग
सैफ अली खान - दिल्ली
कंगना रनौत - दिल्ली
अक्षय कुमार - भोपाल
प्रियंका चोप्रा - अमेरिका
अनुष्का शर्मा, रेखा, गुलजार, जॉन अब्राहम, रणवीर सिंह, श्रद्धा कपूर, झोया अख्तर यांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वरुण धवनचं नाव मतदार यादीत नसल्याने त्याला मतदान करता आलं नाही. भरत जाधव, प्रशांत दामले, मनवा नाईक, तेजस्विनी पंडीत, श्रेयस तळपदे, उदय टिकेकर, राणी-मिलिंद गुणाजी, भार्गवी चिरमुले, किशोरी शहाणे यासारख्या मराठी कलाकारांनीही मतदान केलं.
दुसरीकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुशिलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस यांसारख्या राजकीय नेत्यांनीही सहकुटुंब मतदान केलं.
मुंबईत सरासरी 52.17 टक्के मतदान पार पडलं आहे. सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी दहा वाजता मतमोजणी केली जाणार आहे. मुंबईसह राज्यातील 10 पालिकांमध्ये 1268 जागांसाठी तब्बल 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. तब्बल 21 हजार पोलिंग स्टेशनवर मतदान पार पडलं.