मुंबई: युतीमध्ये हा वाद सुरु असताना तिकडे मुंबईतल्या आघाडीमध्येही काही आलबेल राहिलेलं नाही. काल काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत आघाडीचा दिलेला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळून लावला. त्यानंतर आता निरुपम यांनी राष्ट्रवादीवर थेट हल्लाबोल करत राष्ट्रवादीची भाजपशी छुपी युती असल्याचं वक्तव्य केलं आहे.
काल शिवसेना आणि भाजपची युती तर आज मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये जुंपली आहे. मुंबईत काल उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीसाठी काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आला होता. पण आपल्याला आघाडीबाबात कोणताही फोन अथवा पत्र आलेलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितलं.
'आघाडीची चर्चा समोरासमोर होते. माध्यामांमधून कोणतेही प्रस्ताव दिले जात नाही.' असं अहिर यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही काळात शिवसेना विरुद्ध भाजपसोबत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीचा वादही रंगणार आहे.