गोवा: शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन असतानाही युतीमध्ये मतभेद होती. पण कधी एकमेकांवर हल्लाबोल केला नाही. पण सध्या शिवसेनेकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल गडकरींनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरींनी आपलं मत व्यक्त केलं.


'25 वर्ष युतीत आम्ही सडत राहिलो हे म्हणणं चुकीचं'

'युती करायची की नाही हा दोन्ही पक्षाचा निर्णय आहे. युती नसती तर 95 साली युतीचं सरकार आलं नसतं. काल उद्धव यांनी जे शब्द वापरले किंवा 'सामना'मधून जे शब्द वापरले जातात त्यामुळे दोन्ही पक्षातील अंतर वाढत आहे. 25 वर्ष युतीत आम्ही सडत राहिलो हे म्हणणं चुकीचं आहे.' असं गडकरींना शिवसेनेला सुनावलं.

'बाळासाहेबांविषयी अटलजींइतकाच आमच्या मनात आदर'

'शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत अटलबिहारी वाजपेयी यांच्या इतकाच आमच्या मनात आदर होता आणि राहिल. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात तेव्हा ठरलं होतं. की, जेव्हा कधी आपल्याला वाटेल की आपली युती आता तोडायला हवी. त्यावेळी आपण दोघं एकत्र बसूयात चहा पिऊयात आणि आनंदाच्या वातावरणात निरोप घेऊयात.' असंही गडकरींनी सांगितलं.

'युती झाली नाही याचं मला दु:ख आहे.'

'मला असं वाटतं की, शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता येता कामा नये. त्यामुळे दोन्ही पक्षांनी असे शब्द वापरावे की, ज्यामुळे ही कटुता कमी होईल. कारण देशातील सर्वाधिक चाललेली ही युती होती. एका विचाराच्या आधारावर ही युती झाली होती. परंतु आता ही युती झाली नाही याचं मला दु:ख आहे.' असं गडकरी म्हणाले.

'दोन्ही पक्षातील नेत्यांनी कटुता येणार नाही असे शब्द वापरावे'

'25 वर्ष आम्ही गुणागोविंदानं राहिलो. आम्ही बाळासाहेबांना आमचेच नेते मानायचो. त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरावेत. बाळासाहेब आणि प्रमोदजी असताना अनेकदा वाद झाले पण त्यातून आम्ही मार्गही काढले.' असं म्हणत गडकरींनी नेत्यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला.

'महाराष्ट्रातील नेतृत्व सरकार चालविण्यासाठी सक्षम आहे'

'मुंबई पालिका निवडणुकीमुळे युती तोडण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री हे राज्यातील सरकार चालविण्यासाठी सक्षम आहेत. योग्य वेळी ते योग्य तो निर्णय घेतील.' असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केलं.

VIDEO: