मुंबई : वारीमुळे माणुसकीचं खऱ्या अर्थानं दर्शन झालं, अशी भावना अभिनेता संदीप पाठकने ''माझा कट्टा'वर बोलताना व्यक्त केली. तसेच एबीपी माझाच्या 'माझा विठ्ठल माझी वारी' या कार्यक्रमानिमित्त वारीत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल 'माझा'चे धन्यवाद मानले.

वारीतल्या अनुभवांबद्ल सांगताना संदीप म्हणाला की, ''वारीमध्ये 'माऊली' नावाच्या क्षितीजाखाली अनेक जातींचे लोक एकत्रित येतात. यात कुणाला दुखलं खुपलं याची स्वत:हून काळजी घेतात. त्यामुळे खऱ्या माणुसकीचं दर्शन वारीतच घडतं,'' असं त्यानं यावेळी सांगितलं.

शिवाय वारकऱ्यांसाठी 'विठूराय' ही आई असल्याचं सांगून संदीप पुढे म्हणाला की, ''विठ्ठल कुठल्या जातीत, धर्मात बांधला गेलेला नाही. तो सर्वांच्यात आहे. वारकरी मंडळी विठूरायाला आपली आई समजतात. म्हणूनच ते त्याचा उल्लेख एकेरी करतात,'' असंही तो यावेळी म्हणाला.

लक्ष्मण देशपांडे यांनी मराठी रंगभूमीवर अजरामर केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडन'ला या नाटकाबद्दल सांगताना संदीप म्हणाला की, ''लक्ष्मण देशपांडेचं वऱ्हाड हे नाटक रंगभूमीवरचा मोठा एकपात्री प्रयोग आहे. या नाटकात लोककलेचा अंतर्भाव आहे, आणि खरं सांगयचं तर लोककला ही मराठी रंगभूमीची ताकद. त्यामुळेच शब्दांमधून वाक्यांमधून स्थळं उभी राहणं शक्य होतं. ते नाटक पुन्हा मला रंगभूमीवर सादर करण्याची संधी मिळतेय याबद्दल दिग्दर्शकांचा आभारी आहे.''