मुंबई / सिंधुदुर्ग : ‘अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचा मला पश्चाताप नाही, मच्छिमारांच्या प्रश्नांवर मी हसत हसत तुरुंगात जायला मी तयार आहे.’ असं म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आपल्या कृतीचं पुन्हा एकदा समर्थन केलं आहे.


केसरकर फक्त सिधुदुर्गाचे गृहमंत्री आहेत. राणेंचा विषय आला का तात्काळ कारवाई केली जाते. पण त्यांना इतर गुन्हे दिसत नाही. असा आरोप करत नितेश राणेंनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर यावेळी केला.

माझ्यावर कारवाई करून शिवसेना मच्छिमारांचा आवाज दबण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता तसं होणार नाही. कारण आता मच्छीमार पेटून उठेल. असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.



दरम्यान, दुसरीकडे नारायण राणे यांनी नितेश राणेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. ‘जी नितेशची भूमिका ती माझी भूमिका. तो अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेला त्याचं मी समर्थन करणार. पण त्याच्या मारण्याचं समर्थन नाही.’ असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं.

काय आहे नेमकं प्रकरण?



मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी, सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते.

आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथं भेट दिली. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली.

यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले.

तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथं यावं लागतं, असं म्हणत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.

संबंधित बातम्या:

नितेश राणेंनी मत्स्य आयुक्तांवर मासे फेकले