मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह इतरही पक्षाचं पाणीपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, बहुतांश जागांवर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. तर, 128 जागांवर उमेदवार उभे केलेल्या मनसेलाही सपाटून मार खावा लागला आहे. विशेष म्हणजे मनसेच्याही (MNS) जवळपास 100 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी अद्याप या पराभवावर सविस्तर प्रतक्रिया दिली नाही. मात्र, हे निकाल अविश्वसनीय असल्याचे म्हटले, तूर्तास एवढचं असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे, महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणेच राज ठाकरेंच्या मनातही ईव्हीएमबद्दल शंका आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, आता महाविकास आघाडीकडून राज ठाकरे यांना साद घालण्यात आली आहे. जर ईव्हीएम विषयावर मनसेला आक्षेप असेल तर आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मनसेला महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे. 


लोकशाही वाचविण्यासाठी जे आमच्यासोबत येतील ते येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत इतके पैसे वाटले, त्यामुळे आचारसंहिता अस्तिवात होती असे वाटले नाही. त्यामुळे, मनसेची इच्छा असेल आणि आम्हाला जे वाटते तेच त्यांना वाटत असेल तर त्यांना सोबत घेऊ असे जयंत पाटील यांनी म्हटले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर विजय मिळाला असून महायुतीने 237 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर, ईव्हीएमच्या घोळावरुन शंका व्यक्त करत काँग्रेस व शिवसेन युबीटी पक्षाने ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारणार असल्याचं म्हटलं. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही वकिलांची टीम तैनात करत कायदेशीर लढाईला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेण्याबाबत जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. जर ईव्हीएम विषयावर मनसेला आक्षेप असेल तर आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत, असे पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, आता मनसेचं या भूमिकेवर काय उत्तर येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.


सत्ताधाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षनेते पद द्यावे


विरोधी पक्षनेते पद मिळेल, एवढे आमच्या पक्षांकडे मत नाही, सत्तारूढ पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवला तर विरोधी पक्षनेता पद दिले तर विधानसभा व्यवस्थित चालवता येतील, असेही जयंत पाटील यांनी विधानसभा विरोधीपक्षनेतेपदावर भाष्य करताना म्हटले. दरम्यान, महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला असून एकाही पक्षाला विधानसभा विरोधीपक्षनेते पदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचं संख्याबळ गाठता आलं नाही. दरम्यान, मी आहे तिथेच आहे, त्यांच्याकडे बहुमत असून आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर आम्ही काय बोलणार, असे म्हणत मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांवर बोलणे पाटील यांनी टाळले.


हेही वाचा


2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया