मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण समीर वानखेडे जन्मानं मुस्लिमच असल्याचं मुंबई महापालिकेकडे असलेल्या मूळ नोंदीत नमूद आहे. मुंबई महापालिकेकडे असलेल्या मूळ नोंदीत समीर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊद आणि धर्माची नोंद मुस्लिम आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 


समीर वानखेडेंचा जन्म झालेल्या खासगी रुग्णालयाकडून मुंबई महापालिकेच्या ई वॉर्डकडे आलेल्या जन्म नोंदीच्या माहितीतही तोच उल्लेख आहे. तर, 1991 मध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांचं नाव दाऊदऐवजी ज्ञानदेव लावण्यासाठी कुटुंबातील सदस्याकडून अर्ज करण्यात आला. त्यानंतर समीर यांच्या वडिलांचं ज्ञानदेव हे नाव कागदोपत्री कायम राहिले पण मुस्लिम धर्माचं हिंदू कधी आणि कसं झालं हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेनं मूळ नोंदीची सर्व माहिती मुंबई पोलिसांना दिलीय. 


समीर वानखेडेंच्या नावावर बार आणि रेस्टॉरंट
समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतील वाशी येथे बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असल्याचे वृत्त गुरुवारी समोर आले. उत्पादन शुल्क विभागाच्या नोंदीनुसार हॉटेल सदगुरुचा परवाना समीर वानखेडे यांच्या नावावर आहे. ते 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी करण्यात आले आणि नियमानुसार त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ते 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. 


हॉटेल सदगुरु बार आणि रेस्टॉरंट असल्याने, या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केल्याचं समीर वानखेडेंनी म्हटलंय. तसं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय.


मुंबई एनसीबी (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेटवरुन सध्या वादंग सुरु आहे. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या आरोपांच्या सपाट्यानंतर वानखेडेंच्या कास्ट सर्टिफिकेटवरुन (Cast Certificate) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रांरीनुसार, मुंबई पोलीस एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. आता आमखी दोन व्यक्तींनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता मुंबई विभागातील कास्ट सर्टिफिकेट स्क्रूटनी कमिटीनं देखील याप्रकरणी तपास सुरु केला आहे. 


संबंधित बातम्या :