मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आज (28 मे) आपली भूमिका मांडणार आहेत. मुंबईत आज संध्याकाळी पाच वाजता संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चा यांची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट
तत्पूर्वी खासदार संभाजीराजे आज दुपारी 12 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काय करता येईल यासंदर्भात ही भेट होणार आहे. याशिवाय संभाजीराजे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार असल्याचं समजतं, परंतु भेटीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.
शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं?
मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजेंनी काल (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 13 मिनिटांच्या या भेटीत मराठा समाजाची अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा संभाजीराजेंनी केला. सोबतच आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन पवारांना केल्याचं त्यांनी सांगितलं.
गरीब, गरजू मराठा समाजाला न्याय मिळावा ही राज ठाकरेंची भूमिका
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली. भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले की, "राज ठाकरे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे." तसंच राज ठाकरे यांचे आजोबा आणि माझे आजोबा यांचे असणारे संबंध, शिवाय गडकिल्ल्यांचं संवर्धन यावरही चर्चा केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.
महाराष्ट्र दौऱ्यानंतर संभाजीराजेंच्या गाठीभेटी
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ते विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन करत आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला संभाजीराजेंचं उत्तर
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली होती. पण मोदींनी भेट नाकारली असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संभाजीराजेंनी 4 वेळा भेट मागण्याच्या आधी 40 वेळा मोदींजींसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. पण त्यानंतर 4 वेळा भेट नाकारण्याचं कारण कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नाही, राज्याचा आहे." तसंच भाजपने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे छत्रपती सांगत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती.
त्यावर उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले की, "मला कोणाच्या पाठिंब्याची गरज नसून आरक्षणाच्या लढाईसाठी मला समाजाचा पाठिंबा आहे. मी अचानक येऊन टपकलो नाही." तसंच "आरक्षणाच्या लढाईत विनायक मेटे आणि माझी तुलना करु नका, मेटे मेटे असून मी संभाजी छत्रपती आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द
राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना 2018 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार, कलम 342 अ समाविष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने खोडून काढला. मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका योग्य असल्याचं ठरवत मराठा आरक्षणाची तरतूद फेटाळून लावली आहे. आता राज्य सरकार या सर्वातून काय मार्ग काढतं ते पाहणं औत्सुक्याचं आहे.
संबंधित बातम्या