मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या 'संभाजी ब्रिगेड' संघटनेचं आता राजकीय पक्षात रुपांतर झालं आहे. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.


मनोज आखारे हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. भगव्या ध्वजावर संभाजी ब्रिगेड असं लिहिलेला ध्वज हा पक्षाचा झेंडा असेल. यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यापूर्वी मुंबईत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिसरात अवैधपणे बॅनर लावल्याचा आरोप झाला. पोलिसांच्या मदतीनं हे बॅनर हटवण्यात आले. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.