Mohit Kamboj: वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतरही बेकायदेशीरपणे बारमध्ये मद्यपान पार्टी करणाऱ्या भाजपशी संबंधित असलेले मोहीत कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल कारवाई करावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ते खार पोलीस ठाण्यात धडकले आहेत. मध्यरात्रीनंतरही बार सुरू असल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मोहित कंबोज यांनी दमदाटी केली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून आता कंबोज यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईचा खार पश्चिमेकडील एका बारमध्ये पहाटेपर्यंत तरुण मुलींना अमली पदार्थ आणि मद्यपान करून नाचत असतानाचा एक व्हिडिओ संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे यांनी व्हायरल केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुलींना मानाचे स्थान असताना या बारमध्ये मद्यपान करून नाचवले जात असल्याचा प्रकार हा महाराष्ट्र सहन करणार नाही असे सचिन कांबळे यांनी म्हटले. छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते कंबोज यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत. जोपर्यंत खार पोलीस मोहित कंबोज विरोधातील तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नसल्याचा इशारा छत्रपती संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे यांनी दिला आहे.
सोशल मीडियावर बारमधील व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कंबोज आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?
संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण एक वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर 'रेडिओबार हा पहाटे 3.30 वाजेपर्यंत चालू होता व आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रॅफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कंबोज हे मद्यधुंद अवस्थेत होते.
कंबोज यांनी अरेरावी केल्याचा आरोप
त्यानंतर सचिन कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कम्बोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य पध्दतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. "हिंमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा. मी आता देवेंद्रला फोन करतो बघा," असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कम्बोज हे त्याही अवस्थेत दारू पित राहिले. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कंबोज हे वारंवार देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचा उल्लेख करीत असल्याने पोलीस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर असल्याचेही राऊत यांनी म्हटले.
महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. 'रेडिओ' बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. ही बाब गंभीर आहे. खार पश्चिमेचा 'रेडिओ' बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित 'रेडिओबारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.