Amit Thackeray Speech : "तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील," असं वक्तव्य मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केलं. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा (MNS Kamgar Melava) आज मुंबईत (Mumbai) पार पडला. यावेळी अमित ठाकरे यांनी लवकरच सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला. 


आपण लवकरच सत्तेत असू : अमित ठाकरे


या कामगार मेळाव्यात बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. तुम्ही उगाच माझं नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणतात 50 टक्के कामं होतात, काही कामं होत नाहीत. आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील"


पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे : शर्मिला ठाकरे


या मेळाव्यात शर्मिला ठाकरे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, "अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाली आहे. मी आज इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी मी इथे आलेय. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी मी इथे आले आहे. पुढच्या वर्षी मी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम 60 प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगलं काम केलंय म्हणून एवढे युनिट वाढले आहेत.



राजकारणात सध्या कुस्त्या सुरु आहेत : बाळा नांदगावकर


तर या कामगार मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते म्हणाले की, "सध्या राजकारणात कुस्त्या सुरु आहेत. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदेंसोबत सुरु आहे तर फडणवीस सोबत सुद्धा कुस्ती सुरु आहे. संजय राऊत विरुद्ध नितेश राणे अशी कुस्ती सुरु आहे. अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरु आहे. बारसूमध्ये पण कुस्ती सुरु आहे. कोण कोणाच्या समर्थनार्थ आहे कोण विरोधात हेच कळत नाही. राज ठाकरे यांची या कुस्तीत एन्ट्री होईल." तसंच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी शुभेच्छा दिल्या. परंतु भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मनसे नेत्यांनी बोलणं टाळलं. 


कामगार मेळाव्याला राज ठाकरे अनुपस्थित


दरम्यान मनसेच्या कामगार मेळाव्याला अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे प्रवक्ते गजानन काळे उपस्थित होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र कामगार मेळाव्याला अनुपस्थितीत होते.